नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ येथे आयोजित काँग्रेस च्या कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांनी पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाबाबत पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे मांडले. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्या उपस्थितीत आयोजित मंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात काँग्रेस नेत्यांनी स्वकीयांवरच आगपाखड केली व पक्षवाढीसाठी आपआपल्यापरीने सल्ले दिले.

नेत्यांनी आपले शल्य व्यक्त करतांना पक्षातील गटबाजी आणि चुकीच्या नेतृत्वपद्धतीवर ताशेरे ओढले. पक्षात जोवर ओबीसी नेतृत्वाला पक्षसंघटना आणि सरकार मध्ये ताकत व मानसन्मान मिळत नाही तोवर पक्ष दुरुस्त होणार नाही असा प्रहार शिवाजीराव मोघे यांनी केला. राज्यातील काँग्रेस चे एकमेव खा. बाळू धानोरकर यांनी देखील पक्षनेतृत्वाणे कच खाल्याने पक्षाला यश मिळाले नसल्याचे म्हटले.

महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी तर पक्षाच्या कार्यपद्धतीविरुद्धच आवाज उचलला. कार्यकर्ते पक्षाचा झेंडा हाती घेऊन पुढे असताना नेते एकमेकांशी भांडण्यात व्यस्त आहेत. जे नेते पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध कटकारस्थान करतात त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, पक्षात निर्णय वेळकाढू पद्धतीने होतात असेच चालत राहिले तर पक्षाला चांगले दिवस येणार नाही असे परखड मत चारुलता टोकस यांनी व्यक्त केले. या सोहळ्यात मंत्र्यांनी देखील आपली व्यथा मांडत पक्षश्रेष्ठींनी आम्हाला आमच्या पद्धतीनं काम करू द्यावे अशी भूमिका मांडली.

अशोक चव्हाण यांनी पडणाऱ्या उमेदवारांना सोडून नव्या दमाच्या कार्यकर्त्याला यापुढे उमेदवारी दिली पाहिजे असे मत मांडले. बाळू धानोरकर यांना उमेदवारी देताना अंतर्गत संघर्ष करावा लागला मात्र योग्य उमेदवार दिल्यामुळेच ते नवसाचे खासदार झाले असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. आम्ही चुकलो तर आमचे कान पकडा मात्र पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर आम्हाला काम करू द्या असे आवाहन करीत यशोमती ठाकूर यांनी यवतमाळ जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी न दिल्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली.

पक्षाला लढणाऱ्या लोकांची आवश्यकता असून लढणारे कोण हे पक्षनेतृत्वाणे ओळखावे असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले. पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मंत्र्यांच्या भावना आपण ऐकल्या आहेत, राज्याच्या सत्तेत काँग्रेसचे केवळ १२ मंत्री असले तरी त्यांनी आपल्या लोकांच्या मार्फत लोकांची कामं करावी, जनतेला विश्वासात घेऊन पक्षाप्रती मान त्यांच्या मनात रुजवावा. सर्व घटकांना, जाती धर्माच्या लोकांना सेवा द्यावी तेव्हाच पक्ष पुढे वाढेल असे राज्यसभेचे विरोधीपक्षनेते गुलामनबी आझाद यांनी यावेळी मार्गदर्शन केले.