नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चोपडा येथील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या समस्या दूर करण्यासाठी आणि एनसीडीसी तर्फे निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे कामगार राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

तापी शेतकरी सहकारी सुतगिरणी मर्यादित चोपडा येथील २५ हजार चात्यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार अनिल पाटील, माजी आमदार सुरेश पाटील, सतिश पाटील, दिलीप सोनवणे, तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीचे चेअरमन कैलास पाटील, व्हाईस चेअरमन प्रभाकर पाटील, तहसिलदार अनिल गावीत आदी उपस्थित होते.श्री. पाटील म्हणाले, सुतगिरणीचे तीन वर्षातील काम वाख्याण्याजोगे आहे. अतिशय अडचणीतून या सुतगिरणीची उभारणी झालेली आहे. दहा हजार चारशे चात्यांवर सुरुवात झालेल्या या सुतगिरणीने पंचवीस हजार नऊशे वीस चात्यांवर सूत उत्पादन सुरु करुन जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

सुतगिरणीमुळे तालुक्यातील अनेक बेरोजगारांना तरुणांना काम मिळाले आहे. ही प्रगती सुरू राहण्यासाठी शासनतर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल.श्री. पवार म्हणाले, सुतगिरणी चांगली चालविण्यासाठी किमान२५ हजार चात्या हव्यात व त्यापुढे ४० हजारापर्यंत नेता यायला हव्यात. या सुतगिरणीने कमी चात्यातही चांगले सूत तयार तयार केले. तापी सहकारी सुतगिरणीतील सूत महाराष्ट्राबाहेर जात आहे. निर्यातीपर्यंत आपण गेल्याने सुतगिरणीला नफा मिळत आहे. चोपड्याचा शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना इतरांना देणे योग्य नाही. शेतकऱ्याने कष्ट करून कारखाना उभा केला आहे.

सर्व संबंधितांना एकत्रित घेऊन कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि सभासदांच्या हातात कारखाना देण्यासाठी सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याच्या मालाच्या किंमती इतर वस्तूंच्या तुलनेत वाढल्या नाही असे नमूद करून शेतकऱ्याला त्याच्या श्रमाची योग्य किंमत मिळणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.प्रारंभी श्री. पाटील आणि श्री. पवार यांनी सुतगिरणीची पाहणी केली. या सोहळ्यास सुतगिरणीचे संचालक सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.