स्थलातंर करणाऱ्या प्रजातीच्या संवर्धनासाठी भारत कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. स्थलांतर करणाऱ्या वन्यजीव प्रजातींच्या संरक्षण विषयक करारात सहभागी असलेल्या देशांच्या, गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित कोप-१३ परिषदेचे उद्धाटन काल मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे केले, त्यावेळी ते बोलत होते.

संवर्धन, शाश्वात जीवन शैली आणि हरित विकास मॉडेल या मूल्यांवर आधारित हवामान कृतीचा भारत अवलंब करत आहे, असे ते म्हणाले. वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचं संवर्धन हा भारताच्या सांस्कृतिक नितीमूल्याचा एक भाग असल्याचे ते म्हणाले.

वन्यजीव संवर्धन तसंच देशात वन अच्छादीत क्षेत्रात वाढ करण्यासाठी आपल्या सरकराने विविध उपक्रम हाती घेतले, त्याचे परिणाम उत्साहवर्धक आहेत. २०१० मध्ये वाघांची संख्या एक हजार ४११ होती ती आता दोन हजार ९६७ वर गेली आहे, असं त्यांनी सांगितलं. लवकरच भारत सागरी कासव धोरण आणि सागरी तटव्यवस्थापन धोरण आणणार आहे.

मायक्रोप्लास्टिकमुळे होणा-या प्रदुषणालाही या धोरणामुळे आळा बसेल, असं त्यांनी सांगितले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर, पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि सी.एन.एसचे कार्यकारी सचिव एमी फ्रानेलकेल यावेळी उपस्थित होते.

स्थलांतर करणारे पक्षी, सस्तन प्राणी आणि जलचर प्रजातींना त्यांच्या स्थलांतर मार्गावर असलेला धोका वाढत चालला असून, त्यांच्या रक्षणासाठी सर्व देशांनी काम करणं गरजेचे आहे, असे जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. सुमारे २३० देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे.