नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये शैक्षणिक देवाण-घेवाण होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

दिल्ली सचिवालयात श्री. सामंत यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली.

या भेटीनंतर पत्रकारांना दिलेल्या माहितीत श्री. सामंत म्हणाले, दिल्ली शासनाने शैक्षणिक अभ्यासक्रमात काही उत्कृष्ट उपक्रम राबविलेले आहेत. त्यांचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होत आहे. याच पद्धतीचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही व्हावा याबाबत आज चर्चा झाली. परदेशातील शैक्षणिक संस्थासोबत सामजंस्य करार केले जातात, त्याच धर्तीवर इतर राज्यातील उत्कृष्ट उपक्रमाबाबतही करार व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रयत्नशील आहे.

अन्य राज्यातही शैक्षणिक चांगले उपक्रम राबविले असल्यास त्याचीही माहिती घेतली जाईल, असेही श्री सामंत म्हणाले. पुढील काळात राज्यातील शिक्षण विभागाचा चमू दिल्ली शासनाला भेटून शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दलची संपूर्ण माहिती घेईल. श्री. सिसोदिया हेही महाराष्ट्रातील शैक्षणिक पद्धती जाणून घेणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.