नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं आतापर्यंत ५० हजार ८५० कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांना केली आहे. या महिन्याच्या २० तारखेपर्यंत ८ कोटी ४६ लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा फायदा झाला आहे.

गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला ही योजना सुरु झाली होती. या योजनेमुळे देशभरातल्या सर्व शेतकरी कुटुंबांचे उत्पन्न वाढण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी संबंधित खर्च आणि कौटुंबिक गरजा भागवायला मदत होईल. या योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

सुरुवातीला दोन हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत मदत देण्यात आली. केवळ प्राप्तीकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.