नवी दिल्ली : ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’(And Then One Day)  या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना सन 2019 या वर्षाचा साहित्य अकादमीचा भाषांतर पुरस्कार जाहीर झाला आहे.

साहित्य अकादमी चे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देशातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व लेखकांच्या नावांची घोषणा आज केली. ज्येष्ठ पठकथाकार तथा दिग्दर्शक सई परांजपे  यांच्या ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तक म्हणून निवडण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप  50 हजार रूपये, ताम्रपत्र असे आहे. मराठी अनुवाद साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक  भारत सासणे, जयंत पवार, निशिकांत ठकार यांचा समावेश होता.