पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी आयोजित केली आहे. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपच्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्ण बुर्डे व भीमाबाई फुगे या सहा जणांची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे यांची वर्णी लागली आहे. बुधवारी महासभेत या सदस्यांची निवड करण्यात आली.

भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. त्यातील स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, माजी अध्यक्षा ममता गायकवाड, सागर आंगोळकर, राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 29 फेब्रुवारीला संपत आहे. सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापुर्वी नवीन सदस्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार आजच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षनेत्यांनी बंद पाकीटातून नावे दिली. त्यानंतर महापौर उषा ढोरे यांनी सदस्यांची स्थायी समितीत नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.