३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच सुरक्षा व्यवस्थेतील दोन सुरक्षा रक्षकांनी निर्घृण हत्या केली. सरकार ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याने तत्कालीन ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी दावा केला होता. पण, त्यावेळचे देशातील एकूणच शोकाकूल वातावरण गांधी घराण्याला अनुकूल असल्याने त्या संधीचा फायदा घेत इंदिरा गांधी यांचे सुपुत्र राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदावर दावा केला आणि राजीव यांना पंतप्रधानपद हवे आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनीही पंतप्रधान पदावरील आपला दावा मागे घेतला. राजीव गांधी यांनी लगेचच १९८४ सालच्या नोव्हेंबर महिन्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अभूतपूर्व यश मिळवून लोकसभेच्या ४०० हून अधिक जागा जिंकल्या. भारताच्या लोकसभा निवडणूक इतिहासातील हा विक्रमच ठरला. त्या लाटेच्या जोरावर राजीव गांधी यांनी अनेक राज्यातील विधानसभांच्या निवडणुका जिंकून ती राज्ये काँग्रेसच्या ताब्यात आणली.

गांधी घराण्याचा कसलाही वारसा नसताना दुसरा विक्रम केला तो विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी त्यावेळी उपलब्ध असलेली भारतीय जनता पार्टीची सारी प्रचार यंत्रणा राबवून आणि यावेळी केंद्रात भाजपचे सरकार आणायचेच हे उद्दिष्ठ ठरवून नवनव्या कल्पना राबवून प्रचार सुरू केला. यातीलच एक नवी कल्पना म्हणजे, ‘अच्छे दिन आयेंगे’. ही कल्पना इतकी पद्धतशीरपणे राबविण्यात आली की, त्यावेळच्या सा-या वृत्तवाहिन्या, छपाई माध्यमे (वृत्तपत्रे) यांच्यावरही अच्छे दिन आयेंगे या कल्पनेने गारुड केले आणि तेव्हाच्या वृत्तपत्रात, वृत्तवाहिन्यातील जाहिरातींमध्ये ‘अच्छे दिन आयेंगे’चाच मोठा प्रभाव जाणवत होता. तब्बल ३३० हून अधिक लोकसभेच्या जागा जिंकून गांधी घराण्याखेरीज त्यावेळच्या एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीने अर्थात नरेंद्र मोदी यांनी विक्रम घडविला.

पंडित जवाहरलाल नेहरू १९५२ ते १९६४ या काळात पंतप्रधान होते. त्यानंतर अगदीच वाईट दिसू नये म्हणून गांधी घराण्याबाहेरच्या लालबहादूर शास्त्री यांच्याकडे १९६४ ते १९६५ असे वर्षभर पंतप्रधानपद सोपविण्यात आले. पण, दुर्दैवाने शास्त्री यांचा रशियातील ताश्कंद येथे भारत-पाकिस्तान दरम्यानच्या करारावर स्वाक्ष-या करतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि १९६५ मध्येच इंदिरा गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे काँग्रेस पक्षाने सोपविली. १९६५ ते १९८४ या काळात इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या. या काळात पाकिस्तान विरुद्धची दोन युद्धे त्यांनी भारताला जिंकून दिली, हे योग्य आणि इंदिरा गांधी यांच्या धाडसी प्रतिमेला साजेसे असले तरी गुजरातचे मुख्यमंत्रीपद वगळता इतर कोणतेही राजकीय पद हातात नसताना नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या ३३० जागा भारतीय जनता पार्टीला जिंकून दिल्या. यात भाजपच्या एकाही मित्रपक्षाचा समावेश नव्हता. मित्रपक्षाला म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बरोबर घेऊन भाजपने जिंकलेल्या जागांची संख्या कितीतरी मोठी होती.

लोकसभा जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी राबवलेली ‘अच्छे दिन आयेंगे’ या संकल्पनेचा मतदारांवर इतका मोठा प्रभाव पडला की, भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत मत न दिल्यास, आपल्या हातून मोठी चूक होईल हे मनाशी ठरवूनच मतदारांनी शक्य असेल तिथे भाजपवर आणि इतर काही ठिकाणी भाजपच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांवर मतांचा वर्षाव केला. पण, ‘अच्छे दिन आयेंगे’ हे आपल्याला बनविण्याचे एक गिमिक होते हे मतदारांच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही. त्याचा भारतीय जनता पार्टीला पहिला झटका दिला तो दिल्लीच्या मतदारांनी. लोकसभेपाठोपाठ दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि दिल्लीत भाजपचा मोठा पराभव झाला. ७० पैकी तब्बल ६७ जागा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने जिंकल्या, तर भाजपच्या पदरात केवळ तीन जागा पडल्या.

अच्छे दिन आयेंगे या कल्पनेवर आधारित प्रचाराला दिल्लीच्या मतदारांनी दिलेले हे चोख उत्तर होते. पुढे देशभरातील मतदारांच्याही अच्छे दिन या प्रचाराचा फोलपणा लक्षात आला आणि अगदी मोदी आणि अमित शाह यांच्या गुजरातमधील विधानसभा काँग्रेसने भारतीय जनता पार्टीला धडा शिकविला. त्या निवडणुकीत १६५ पेक्षा एकही जागा कमी जिंकल्यास भाजप विजयाचा आनंद साजरा करणार नाही, असे अमित शाह यांनी जाहीर केले.