नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावरच्या 119 भारतीयांना आणि श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू या देशाच्या पाच प्रवाशांना टोकियोहून घेऊन येणारं एयर इंडियाचं विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झालं.
या जहाजावरच्या भारतीयांना परत आणण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी जपानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. परत आणलेल्या सर्व प्रवाशांना हरयाणामध्ये मानेसार इथं 14 दिवस देखरेखीखाली वेगळं ठेवलं जाईल. या जहाजावरच्या एकूण 138 भारतीयांपैकी 16 भारतीय कर्मचाऱ्यांना विषाणूसंसर्ग झाला होता. या सोळा जणांवर जपानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
टोकियोमधला भारतीय दुतावास सातत्यानं त्यांच्या संपर्कात असून, त्यांच्या तब्येतीमध्ये होणाऱ्या सुधारणेची माहिती घेत आहे. दुसरीकडे भारतीय हवाई दलानं कोरोनाग्रस्त वुहानमधून 76 भारतीयांना आणि सात देशांच्या 36 नागरिकांना परत आणलं आहे. बांगलादेश, म्यानमार, मालदीव्ज, चीन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि मादागास्करचे हे नागरिक आहेत. या सर्वांना परत आणण्यासाठी चीन सरकारनं केलेल्या सहकार्याची जयशंकर यांनी प्रशंसा केली आहे.
भारतानं काल आपल्या नागरिकांना वुहानमधून परत आणण्यासाठी एक विमान पाठवलं होतं आणि या विमानातून चीनला आवश्यक वैद्यकीय सामग्री देखील पाठवली होती.