नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचं उद्दिष्ट गाठण्यात भारताला यश आलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या ६४ व्या राष्ट्रीय परिषदेचं काल हर्षवर्धन यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून देशातल्या ५० कोटी नागरिकांना सुरक्षा कवच मिळेल, तसंच देशभरात सर्वत्रच आरोग्य केंद्र उभारली जातील, असं त्यांनी सांगितलं.

२०२२ पर्यंत देशभरातल्या दीड लाख प्राथमिक आरोग्य केंद्राचा कायापालट करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय रचत सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टाची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं भारत सक्षम असल्याचंही ते म्हणाले.