मुंबई : दोहा (कतार) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून शैक्षणिक केंद्र सुरू करण्यासाठी कतार शासनाशी सामंजस्य करार झालेला आहे. याबाबत शासन सकारात्मक असून विद्यापीठाने तातडीने प्रस्ताव शासनाला पाठवावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

श्री. सामंत म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यातून दोहा प्रोफेशनल सर्विसेस होल्डिंग डब्ल्यूएलएल दोहा, कतार या संस्थेने कतार येथील शासनाशी सामंजस्य करार केलेला आहे. या प्रस्तावाला कतार शासनाने परवानगी दिली असून राज्य शासन याबाबत सकारात्मक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा. यासाठी राज्य शासन सहकार्य करेल त्यानंतर विद्यापीठाने केंद्र शासनाच्या परवानगीची प्रक्रिया जलद गतीने करून हे शैक्षणिक केंद्र लवकर सुरू करावे, असे श्री. सामंत यावेळी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, परदेशामध्ये मराठी भाषेचा प्रसार आणि प्रचार होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी ‘दोहा प्रोफेशनल सर्विसेस होल्डिंग डब्लूएलएल दोहा, कतार’  ही संस्था पुढाकार घेऊन मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाचा विदेशात शुभारंभ करीत आहे. ही आनंदाची बाब आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी पूर्ण करून कालबद्ध कार्यक्रम तयार करावा अशा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.

अभ्यासक्रम

 पदवी, पदविका, सांस्कृतिक कार्यक्रम, सहयोगाने भाषा कार्यक्रम, शिक्षक – विद्यार्थी आदान-प्रदान, संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम,विविध कार्यशाळा इ. अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

यावेळी आमदार भाई जगताप, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.नितीन करमळकर, संस्थेचे अध्यक्ष हसन चौगुले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.