मुंबई : ठाणे जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, नगरविकास, जलसिंचन, मेट्रो आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा आढावा बैठक झाली. या बैठकीस नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व स्थानिक आमदार, सर्व संबंधित विभागांचे सचिव, महानगर पालिकांचे आयुक्त आदी उपस्थित होते. यावेळी आमदार, लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागाविषयीच्या मागण्या मांडल्या.
मीरा- भाईंदर शहराची पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन चेना नदीचे पाणी अडवून शहराला मिळावे यासाठी मागणी होत आहे. या अनुषंगाने अभ्यास करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. घोडबंदर, मीरा- भाईंदर खाडीकिनारा (वॉटरफ्रंट) विकास, अंतर्गत जलवाहतुकीसाठी जेट्टींचा विकास, ठाणे शहरामध्ये कोस्टल रोड, उन्नत रस्ते, झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन, समूह पुनर्विकास आदी बाबींच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यानंतर त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सफाई कामगारांच्या पाल्यांना नोकरीमध्ये कायम ठेवण्याची मागणीवर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. अंबरनाथ- बदलापूर पाणीपुरवठा योजनेवर महिनाभरात तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.
माळशेज घाट येथे उत्कृष्ट असा काचेचा स्कायवॉक विकसित करण्याचा प्रस्ताव असून पर्यटनाच्या दृष्टीने देशातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरेल, असेही श्री. ठाकरे म्हणाले. उल्हासनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असतानाही वालधुनी नदीमध्ये कंपन्या प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित झाली आहे. याबाबत तपासणी करुन कार्यवाही करण्यात येईल.
शहापूरला बाहुली प्रकल्पाचे पाणी गुरुत्व पद्धतीने मिळावे यासाठी कार्यवाही करावी. तसेच घाटनदेवी पाणी योजनेसाठी सर्वेक्षण करावे, असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.