मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या  निविदा प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात विधानभवनातील दालनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

श्री.पटोले म्हणाले, लोकहिताच्या दृष्टीने शासनस्तरावरील कामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.  कामांना विलंब  झाल्यास शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यासाठी प्रकल्प वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाचे  प्रकल्प  वेळेत  पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावे. रस्ते, पूल, इमारती तसेच  जलसंपदा विभागाअंतर्गत येणारी धरणे, कालवे व इतर कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी लवकरात लवकर शुद्धीपत्रक तयार करा, अशा सूचना श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते) चे सचिव सी.पी.जोशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आदी अधिकारी उपस्थित होते.