मुंबई : राज्यातील मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल येत्या दहा दिवसात येणार असून अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सतिश चव्हाण यांनी सारथी संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री.वडेट्टीवार बोलत होते. राज्यातील मराठा, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची स्वायत्तता कायम ठेवण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात या संस्थेसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात येईल, असे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

सारथी गैरव्यवहारप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने पुणे येथील सारथीच्या मुख्यालयात जाऊन या प्रकरणाची चैाकशी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची अधिक चैाकशी करण्यासाठी श्री. कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे. सारथी अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती, विद्यावेतनाचे पैसे थकित असल्यास ते येत्या १५ दिवसाच्या आत दिले जातील, असे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री महादेव जानकर, भाई गिरकर, सुरेश धस यांनी भाग घेतला.