मुंबई : मुंबईत कर्करोग झालेल्या रुग्णांची उपचाराची गरज लक्षात घेता येत्या काळात मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य जोगेंद्र कवाडे यांनी विधानपरिषदेत मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील सोयीसुविधांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. मुंबईतील जे.जे. रुग्णालयाला लवकरच दीडशे वर्ष पूर्ण होणार आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात येणार आहे. यादरम्यान जे.जे. रुग्णालयात कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जे.जे. रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग कार्यरत असून या संस्थेत कुठलीही हृदय शस्त्रक्रिया बंद पडलेल्या नाहीत. अपुऱ्या औषध पुरवठ्याअभावी कोणत्याही शस्त्रक्रिया बंद पडलेल्या नसून रुग्णसेवा अखंडित सुरू असल्याचे श्री. देशमुख यांनी  यावेळी सांगितले.

विधिमंडळ सदस्यांसाठी औषधोपचाराची एक योजना यापूर्वी अस्तित्वात होती. ती सध्या स्थगित आहे. मात्र, केवळ विधानसभा आणि विधानपरिषदच नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभेच्या राज्यातील सदस्यांसाठी एक वेगळी योजना आणण्यासंदर्भात धोरण आखण्यात येईल, असे श्री. देशमुख यांनी या लक्षवेधीवरील एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य विक्रम काळे, भाई गिरकर, अमरनाथ राजूरकर, अनंतराव गाडगीळ, डॉ.परिणय फुके यांनी भाग घेतला.