नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचारावर चर्चा व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी मान्य न केल्यामुळे झालेल्या गदारोळात आज लोकसभेचं कामकाज दुस-यांदा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

सकाळी सदनाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, सपा, बसपा आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली. या मुद्यावर होळीनंतर ११ तारखेला चर्चा करायला सरकार तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.

मात्र यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांचं समाधान झालं नाही. गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. गेले तीन दिवस लोकसभेचं कामकाज वारंवार स्थगित होत आहे.