नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेतही आज चर्चा झाली, या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात आज या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका नसला, तरीही राज्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर यासंदर्भात खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
होळी, धुलिवंदन, आणि रंगपंचमी हे सण साजरे करताना विषाणू संसर्गाबाबत काळजी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या चर्चेला प्रारंभ केला. या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी सभा संमेलनं, तसंच उत्सवांची आयोजनं टाळावीत, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं.
अशा आयोजनांना उपस्थित राहण्याचं, तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं नागरिकांनी टाळावं, असंही ते म्हणाले. अनेक सदस्यांनी या विषयावर आपापली मतं व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहाराची फेरचौकशी केली जात असून, दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती कामगार मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिली. सारंगवाडी साठवण तलाव निर्मितीकरता भू-संपादन केलेल्या शेतक-यांना येत्या तीन महिन्यात मोबदला देण्यात येईल, असं मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
राज्यातल्या 35 लाख विधवा निराधार परित्यक्ता घटस्फोटीतांना देण्यात येणा-या अनुदानाच्या रक्कमेचे वाटप येत्या 15 दिवसात करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.