नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम उपनगरातल्या मेट्रो मार्ग २ ए आणि ७ या दोन मेट्रो मार्गिकांच्या स्थानकाजवळ मॉल आणि व्यावसायिक संकुलांच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज खासगी विकासंकाची कार्यशाळा घेतली. या दोन्ही मार्गिका २०२० च्या  अखेरीस पूर्ण  होतील. या कार्यशाळेत विकासकांच्या नवीन कल्पना, सूचना, डिझाइन, बांधकाम, याबाबतच्या शंका ओ अँड एम व्यवस्था,  अटी आणि शर्ती तसंच इतर कार्यपद्धतींवर निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली.

मेट्रो स्थानकांमध्ये  सुलभ प्रवेशासाठी प्राधिकरणानं मेट्रो मार्गांसाठीचं ‘मल्टी-मॉडेल एकत्रीकरण’ देखील सुरू केलं आहे. मेट्रो स्थानकात प्रवेश करताना मॉल आणि व्यावसायिक संकुलांमध्ये थेट प्रवेश करणं लोकांसाठी तसंच विकासकांसाठीही फायदेशीर ठरेल, असं प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे ४ मार्च ते १० मार्च या कालावधीत  राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह राबविला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिवसाचं औचित्य साधून ४ मार्चला  मुंबई मेट्रो पॅकेज – २ च्या जागांची पाहणी करण्यात आली. यावेळी मेट्रो प्रकल्पात काम करणारे  अभियंते आणि कामगारांतर्फे सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली.