नवी दिल्ली : बिहारमध्ये झपाट्याने पसरत असलेला मेंदूज्वर नियंत्रणात आणून उपचार यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी बालरोगतज्ञ आणि निमवैद्यकीय सेवांची अतिरिक्त पथके बिहारला पाठवली आहेत. या मेंदूज्वराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पाच पथके त्वरित रवाना करण्याचे आदेश हर्ष वर्धन यांनी दिले. प्रत्येक चमूमध्ये दहा बालरोगतज्ञ आणि पाच निमवैद्यकीय सहकाऱ्यांचा समावेश असेल. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर या चमू उपचार करतील. तसेच त्या आजाराचा संसर्ग वाढत असलेल्या भागात गस्त घालून तपासणी करतील, असे हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली सध्या एक चमू बिहारमध्ये कार्यरत असून सर्व उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. त्याशिवाय या रुग्णांसाठी सर्व सेवा आणि उपचार साधनेही पुरवली जात आहेत.