नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने येस बँक या खाजगी बँकेतून पैसे काढण्यावर ५० हजारापर्यंतच्या मर्यादेचे निर्बंध लादले आहेत. हे निर्बंध तीन एप्रिल पर्यंत लागू असतील. मात्र तातडीची वैद्यकीय गरज, उच्च शिक्षण, लग्नकार्य आणि इतर अत्यंत तातडीच्या गरजांसाठी या निर्बंधांमधून सूट दिली असल्याचे, यासंदर्भात केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये प्रचंड अनियमितता आढळून आल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेनही स्वतंत्रपणे अधिसूचना काढून बँकेचे संचालक मंडळ पुढच्या तीस दिवसांसाठी निलंबित केले आहे.

ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये, त्यांच्या हिताचे रक्षण केले जाईल असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

बँकिंग नियमन कायद्याच्या अंतर्गत येत्या काही दिवसांमध्ये या बँकेची पुनर्रचना किंवा विलगीकरण करण्याच्या दृष्टीने एक योजना आणली जाईल असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.