नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना विषाणू विरोधात जगभरातल्या देशांमधल्या सरकारने कठोर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलावीत असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रॉस अधानॉम घेब्रेयेसुस यांनी म्हटले आहे की, चीनच्या बाहेर या विषाणूचा प्रसार १७ पट वेगाने होत असल्यामुळे आता या लढाईत  सर्वांनी सहभागी होऊन ठोस उपाय योजले पाहिजेत.

आतापर्यंत जगभरात या कोरोना विषाणुची लागण ९८ हजाराहून अधिक लोकांना झाली असून या आजारामुळे ३ हजार ३०० हून अधिक मृत्यू झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तरीही अजून काही राष्ट्रे या गोष्टीकडे गांभार्याने पाहात नाहीत असेही ते म्हणाले.

देशात आणखी एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता ३१ वर पोहोचली असल्याची माहिती विशेष आरोग्य सचिव संजीव कुमार यांनी दिली आहे.