नवी दिल्ली : निष्क्रीय झाल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे, ही अतिशय खेदाची बाब असून, ही अकार्यक्षमता दूर करण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

आपल्या लिखित भाषणात त्यांनी राज्यसभेच्या कामकाजाविषयी काही निरीक्षणे नमूद केली आहेत. राज्यसभेत कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यामुळे अनेक महत्वाची विधेयके प्रलंबित आहेत. लोकसभेसोबतच ही विधेयकेही विसर्जित झाल्यामुळे कायदेमंडळाचे मोठे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. कामकाजात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल खंत व्यक्त करत, जनतेसमोर असे चित्र जाणे योग्य नाही, अशी भावना नायडू यांनी व्यक्त केली. कायदेमंडळाचे हे वरिष्ठ सभागृह असून, या सभागृहाने आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संसदेच्या या सत्रात नव्या जोमाने काम करत प्रलंबित विधेयके मार्गी लावावित असे आवाहन त्यांनी सर्व सदस्यांना केले. या सभागृहात परिपक्व आणि अर्थपूर्ण चर्चा व्हावा, अशी जनतेची अपेक्षा असते, या अपेक्षांची पूर्तता सदस्य करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.