नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक योगाभ्यास करण्यात आला. या योगाभ्यासापूर्वी पंतप्रधानांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग’, असे आपले ब्रीदवाक्य असायला हवे, असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी दिला. योगाचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या माध्यमांचे त्यांनी आभार मानले.

आधुनिक योगाचा हा संदेश आता शहरांपासून गावांपर्यंत आणि गरीब घरे तसेच आदिवासी समुदायांपर्यंत पोहचवणे हे आपले उद्दिष्ट आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. गरीब आणि आदिवासींना आयुष्यात अनेक आजारांचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्यांच्यापर्यंत योगाभ्यास पोहोचवणे, आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

बदलत्या काळात, आपला भर केवळ आजार प्रतिबंधन नाही, तर निरामय आयुष्य, असा हवा आणि ती ताकद आपल्याला योगाभ्यासातूनच मिळू शकते. योग हे प्राचीन भारतीय तत्वज्ञान आहे, असेही मोदी म्हणाले. योग म्हणजे आपण केवळ चटईवर करणारी आसने किंवा प्राणायाम नव्हे, तर योग म्हणजे संपूर्ण आयुष्याला शिस्त लावून समर्पित भावनेने करण्याची साधना आहे, असे सांगत आयुष्यभर योगाभ्यास करायला हवा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

योग, वय, वर्ण, जात, धर्म, समुदाय, विचार आणि आचार आणि सीमा यांची बंधने दूर सारणारी, माणसांना जोडणारी साधना आहे. योग सर्वांसाठी आहे.

आज घरांपासून ते कार्यालयांपर्यंत बगिच्यांपासून क्रीडा संकुलांपर्यंत तसेच रस्त्यांपासून आरोग्य केंद्रांपर्यंत सगळीकडे योगाचा अंतर्भाव झालेला दिसतो.

योग एकाचवेळी प्राचीन आणि आधुनिक आहे. स्थिर आणि प्रवाही आहे, असंही मोदी म्हणाले.

गेल्या कित्येक शतकांपासून योगाचे सार कायम आहे. ते म्हणजे निरोगी शरीर, स्थिर मन, एक आत्मा, असे पंतप्रधान म्हणाले. योग म्हणजे ज्ञान, कार्य आणि भक्ती याचा अनोखा संगम आहे, असे त्यांनी सांगितले.

आज जगाने योगाचा स्वीकार केला आहे, तेव्हा आपणही योगासंबंधित संशोधनांवर भर द्यायला हवा. वैद्यक शाखा, फिजियोथेरपी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता अशा क्षेत्रांच्या अभ्यासात योगाचा अंतर्भाव करायला हवा.