नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वच शेअर बाजार कोविड -१९ च्या प्रादुर्भावाच्या भीतीनं कालच कोसळले होतं. मात्र अमेरिकेनं आर्थिक उत्तेजन देण्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई आणि यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून येतयं. कच्च्या तेलांच्या किंमती पण आज ८ टक्क्यांनी वाढल्या.

युरोपातील तीन प्रमुख शेअर निर्देशांकापैकी लंडनस्थित एसटी एसई ३ टक्क्यांनी, पॅरिसचा सीएसी २ टक्क्यांनी तर फ्रँकफर्टचा डीएएल्स २ टक्क्यांनी वधारला. १९९१ साली झालेल्या पडझडीनंतर कालची पडझड सर्वात अधिक होती. गुंतवणूकदार त्याला ‘ब्लॅक मंडे’ म्हणून संबोधत आहेत.

दरम्यान सौदी अरेबिया आणि दुबईच्या बाजारांमध्ये  पाच टक्क्यांनी तर रशियन बाजारांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झालेली दिसली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोनाग्रस्त ‘वुहान’ या शहराला भेट दिल्यानंसुद्धा शेअर बाजारांमध्ये सकारात्मकता दिसली.

दरम्यान कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला २ अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढं नुकसान होण्याची भीती अमेरिकन व्यापार विकास संस्थेने व्यक्त केली आहे.