नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या शस्त्रागाराच्या आधुनिकीकरणासाठी उत्तर कोरिया हल्ल्याचे अधिक मजबूत मार्ग आणि साधनं विकसित करणार आहे, असं आज उत्तर कोरियानं स्पष्ट केलं. गेल्या गुरूवारी उत्तर कोरियानं वासाँग १७ या लांब पल्ल्याच्या नव्या क्षेपणास्त्र प्रणालीचं यशस्वी उड्डाण केलं. त्याच्याशी संबंधित संशोधकांसमवेत केलेल्या फोटोसेशनदरम्यान राष्ट्राध्यक्ष किम जॉंग उन यांनी आज हे निवेदन केलं.
ही २५ मिटर लांब क्षेपणास्त्र प्रणाली १५ हजार किलोमीटरपर्यंत म्हणजे अमेरिकेत कुठेही पोहोचू शकते. जगातली ही सगळ्यात मोठी फिरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. या क्षेपणास्त्रात अनेक शस्त्रास्त्र वाहण्याची क्षमता आहे. ज्या राष्ट्राकडे हल्ल्याची क्षमता अधिक आहे आणि ज्यांचं लष्करी सामर्थ्य मोठं आहे तेच राष्ट्र युद्धाला अटकाव करू शकते, असंही किम म्हणाले.