मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही माहिती दिली. त्यांनी आज नागपुरात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामांची पाहणी केली. तसंच या महामार्गावर इलेक्ट्रिक कारचं सारथ्य करून फेरफटकाही मारला. समृद्धी महामार्गाचं शिर्डी ते नागपूर हे पहिल्या टप्प्यातलं काम आता जवळपास पूर्ण झालं असून फक्त रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करायच्या सोयी सुविधा, तसंच एक्झिट पॉईंट्सवर टोलनाके उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे.
या महामार्गाचे काम अतिशय उत्तम झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ता बांधून तयार झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटपाशी खास रोटरी सर्कल तयार केलं जाणार असून त्यांचं काम देखील सुरू आहे. आज शिंदे यांनी या रोटरी सर्कलच्या कामाचा आढावा घेतला, याच सर्कलच्या मध्यभागी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारायचं नियोजित आहे. सध्या या सर्कलचं काम प्रगतीपथावर असून तेदेखील येत्या काही महिन्यात पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं. या महामार्गावर फेरारी, लॅमबोर्गनी, मर्सिडीज यांच्या सुपरकार्सच्या विशेष रॅलीचंही आयोजन केलं होतं. या रॅलीचं उद्घाटन शिंदे आणि एमएससारडीसीचे महा-व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या हस्ते झालं.