मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या पुण्यात काल दोघांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे. दोन दिवसांपूर्वी दोन बाधित रुग्ण आढळून आले होते. काल या रुग्णांची मुलगी, मुंबई-पुणे प्रवासादरम्यानचा त्यांचा टॅक्सी चालक आणि त्यांच्या जवळच्या आणखी एका व्यक्तीला या विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात एकूण ५० जणांना रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. यापैकी पाचजणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी १२ जणांना पुण्यातल्या नायडू रुग्णालयात, तर अन्य तिघांना मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
१८ जानेवारीपासून महाराष्ट्रात आतापर्यंत ३०४ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, यापैकी २८९ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचे चाचणीत आढळले आहे.