नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचारावर राज्यसभेत उद्या चर्चा होईल. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची मागणी मान्य करत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उद्या दिवाळखोरी आणि नादारी कायदा तसंच इतर काही दुरुस्त्यांवर चर्चा झाल्यानंतर दिल्ली हिंसाचारावर चर्चा होईल असं सांगितलं. दुपारी राज्यसभेंचं कामकाज सुरु झाल्यावर परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी कोरोना बाधित देशांपैकी इराणमधल्या भारतीयांबाबत माहिती दिली.
त्यानंतर आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आदिवासी जमाती कायदा दुरुस्ती सुचवली. या दोन्हींवर चर्चा सुरु असतानाच दिल्ली हिंसाचारांवर चर्चेची मागणी विरोधकांनी रोखून धरली. त्या गदारोळातच राज्यसभेचं कामकाज थोड्या वेळांसाठी आणि नंतर पूर्ण दिवसासाठी स्थगित केलं. त्यामुळे या दोन्हीवरही उद्याच चर्चा होईल.