नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशवासीयांनी घाबरून न जाता, कोव्हीड-19 या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या सद्यस्थितीबाबत,सरकार सतर्क आहे असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. येत्या काळात कुठलाही केंद्रीयमंत्री परदेशात जाणार नाही असं सांगून, अत्यावश्यक नसल्यास परदेश प्रवास टाळावा अशी कळकळीची विनंती, त्यांनी देशवासीयांनाही केली आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, तसच मोठ्या प्रमाणावर एकत्रित जमणं टाळून आपण सुरक्षित राहू शकतो असही त्यांनी सांगितलं. परदेशातून भारतात येऊ इच्छिणाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्यापासून, वेगवेगळ्या प्रकारच्या परिणामकारक आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत, सरकारनं कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.