मुंबई : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. यासाठी राज्य शासनाचा दरवर्षी दहा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. येत्या पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी राज्यातील वृक्षलागवड मोहिमेविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. भरणे बोलत होते. जागतिक तापमानवाढ, हवामान आणि ऋतूबदल याची दाहकता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शासनाने वृक्ष लागवडीचे धोरण अवलंबले आहे.

वृक्ष लागवडीचे धोरण येत्या काळातही कायम ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या वृक्ष लागवडीची माहिती वनयुक्त शिवार या ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काळात सामाजिक संस्थांचीही वृक्ष लागवडीसाठी मदत घेण्यात येणार असल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, हेमंत टकले, अनिकेत तटकरे यांनी भाग घेतला.