नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नागपुरात येत्या ३० मार्चपर्यंत तरण तलाव, व्यायाम शाळा आणि नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज जाहीर केला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता या कालावधीत पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे. इतर ठिकाणच्या शाळांमध्येही परीक्षा उशिरानं घेण्याविषयी चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. हा निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी मॉल आणि सिनेमागृहांना भेटी देणं टाळावं, असं आवाहनही त्यांनी केलं. अत्यावश्यक सेवा असल्यानं रेल्वे आणि बससेवा बंद करणं योग्य होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, जेणेकरुन गर्दी होणार नाही, आणि कोरोना विषाणूच्या फैलावाला अटकाव बसेल, असं ते म्हणाले.
उपहारगृह देखील बंद केली जाणार नाहीत. मात्र आरोग्याच्या दृष्टीनं तिथंही जाणं लोकांनी टाळावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी शक्य त्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
३० मार्चपर्यंत गर्दी होऊ शकणा-या कोणत्याही कार्यक्रमांचं आयोजन करु नये, अशा सूचना आयोजकांना दिल्या आहेत. या कालावधीत कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही, ज्यांना मिळाली असेल, ती रद्द केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.