नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना विषाणू संदर्भातल्या वैज्ञानिक घडामोडींविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या जगभरातल्या देशांच्या गटात भारताचाही समावेश केला असल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या गटात भारत आणि अमेरिकेसह युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर, आणि दक्षिण कोरिया या देशांचाही समावेश आहे या सर्व देशांचे विज्ञान मंत्री आणि मुख्य सल्लागारांची काल दुसऱ्यांदा कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून चर्चा झाली. अमेरिकेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण कार्यालयाचे संचालक डॉक्टर केलविन ड्रोएगेमीअर या कॉन्फरन्स कॉलचे समन्वयक होते.
यावेळी सर्व देशांनी कोविड१९ या आजारा संदर्भातले संशोधन आणि इतर माहिती प्रकाशित करण्याच्या प्रयत्नांना समर्थन दिले. तसंच या देशांनी या संदर्भात उपलब्ध होणारी ताजी माहिती तातडीने उपलब्ध करून द्यायलाही सहमती दर्शवली. या प्रक्रियेला वेळ देण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्लाही गटातल्या सहभागी देशांनी दिला.