नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात काल  रात्री पावसात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये ३ जण ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिरपूर शहरासह तालुक्यात वादळी पाऊस आणि मोठी गारपीट झाली. ५०० हेक्टर क्षेत्र पावसानं बाधित झालं आहे. शिरपूर शहरात झाडं उन्मळून पडली आहेत, वीज खांब मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत.

अमरावती तसंच गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार वादळी पाऊस झाल्याचं वृत्त आहे. या पावसानं गहू आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्येही काल वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं शेतातल्या पिकांचं नुकसान झाल आहे. सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रातल्या गहू, हरभरा या पिकांसह फळबागांचंही नुकसान झाल्याच् आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आंब्याचा मोहोरही गळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या शहागड, खामगाव, वाळकेश्वर, गोरी, गंधारी, सावरगाव, नागझरी या भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धातास पाऊस झाला. शहागड परिसरात काही वेळ गाराही पडल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकाचे नुकसान झालं.

वर्धा जिल्ह्यात या आठवड्यात दुसऱ्यांदा वादळासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. काल रात्री साडेअकराच्या सुमाराला जिल्ह्यात मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं. यात घरांची पडझड झाली असून विद्युत तारा तुटल्या आहेत.

वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर आणि कारंजा  या सहा तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली.  या तालुक्यातील विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत झाला होता. वीज पडल्याने तिघे जखमी झाले.