मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रगीतानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी न्या. भूषण धर्माधिकारी यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. शपथ ग्रहणानंतर राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आणि मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन न्या. धर्माधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
दिनांक 28 एप्रिल 1958 रोजी जन्मलेल्या न्या. धर्माधिकारी यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 1980 रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिवाणी, घटनात्मक, कामगार तसेच सेवासंबंधी प्रकरणांमध्ये वकिली (प्रॅक्टीस) केली. न्या. धर्माधिकारी यांची दिनांक 15 मार्च 2004 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली तर दिनांक 12 मार्च 2006 रोजी त्यांची स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी न्या. भूषण धर्माधिकारी यांची त्यांच्या जागी प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राजभवन येथे झालेल्या या शपथविधीच्या छोटेखानी कार्यक्रमास राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह, न्या. धर्माधिकारी यांचे कुटुंबिय आदी उपस्थित होते.