मुंबई : महाराष्ट्र ही नेहमीच अमन पसंद (शांतताप्रिय) लोकांची भूमी राहिली आहे. राज्यात मागील 5 वर्षात सर्व समुदायातील लोक आपापले सण-उत्सव शांततेत साजरे करत आहेत. इथे असलेल्या शांतता आणि सौहार्दामुळे राज्याच्या विकासालाही चालना मिळाली असून राज्य आघाडीवर राहिले आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पोलीस मुख्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व समाज बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,पोलीस महासंचालनालयाने आयोजित केलेला हा कार्यक्रम आदर्शवत आहे. आनंद वाटल्यानेच आनंद वाढतो. त्यामुळे अशा कार्यक्रमातून समाजातील सौहार्द आणखी वृद्धिंगत होईल. या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी पोलीस महासंचालनालयाचे कौतुक केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांना भेटून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.