नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं, कार्यालयं बंद आहे. त्यामुळे रोजंदारी करणाऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी मुंबईतल्या काही संस्था जेवणाची सोय करत आहेत.

शिख समुदायातल्या लोकांनी काही गुरुद्वारामध्ये दोन दिवसापासून लंगर सुरू केला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये एक स्वयंसेवी संस्था बेघरांना जेवण वाटते आहे. जमात-ए-इस्लामी हिंद, स्टूडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आणि इतर काही संस्थांनी मदनपुरा, जोगेश्वरी, अंधेरी, ओशिवरा, कुर्ला, विक्रोळी, मुंब्रा, कल्याण यासारख्या ठिकाणी सुमारे १ हजार लोकांना जेवणाच्या पाकिटांचे वाटप केलं. काही ठिकाणी ट्रक चालकांनाही जेवण देण्यात आलं.

लोकमान्य टिळक टर्मिनसवर गाड्यांची वाट पाहत थांबलेल्या लोकांना मेमन समाज आणि इतर काही व्यक्तींनी जेवणाची पाकिटं दिली. कल्याणमधल्या १० स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन मुंबईतल्या काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं गरजू कुटुंबांना रेशनच्या सामानाच्या ६०० किट्च्या वाटपाचे नियोजन केले आहे.

मास्क, सॅनिटायझर वगैरे वापरून स्वच्छतेच्या सर्व खबरदारीचे पालन करून या स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते लोकांना मदत करत आहेत.