नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या आज दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी भाजी मंडयांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये सामान्य नागरिकांची गर्दी दिसून आली.
मुंबईत आज रस्त्यावरची वाहतूक कालच्या तुलनेत कमी आहे.ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस बळाचा वापर करून कारवाई करत आहेत. मुंबईत आज महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आलं. महानगरपालिका आणि अग्निशमन दलानं संयुक्तपणे हे निर्जंतुकीकरण केलं.
नाशिकमध्ये संचारबंदी लागू असूनही पूर्व मालेगाव,आजाद नगर, चंदनापुरी या परिसरात अजूनही काही ठिकाणी दुकानं , रस्त्यावर लोकांची वर्दळ सुरू आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात संचारबंदीचं पालन अत्यंत काटेकोर होण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. धुळे शहरातील पाच कंदील चौक आग्रा रोड हा मुख्य बाजारपेठ परिसर आज पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचं चित्र होतं. ,त्यावर उपाय म्हणून श्रीगोंदा इथं विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चोप दिला तर युवकांना तहसीलदार महेंद्र माळी यांनी भर रस्त्यात उठाबशा काढायला भाग पाडलं यामुळे बाहेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना चाप बसला आहे.
परभणी जिल्ह्यात सर्वत्र चोख नाकाबंदी करण्यात आली आहे रस्त्यावर आलेल्या नागरिकांना पोलीस घरी पाठवत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत.
बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे. सकाळी ११ ते ३ या वेळेत ही संचारबंदी शिथील केल्या वर केज, गेवराई, अंबाजोगाई या भागात नागरिकांनी रांगेत उभं राहून सामानाची खरेदी केली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी औषध फवारणी करण्याचा निर्णय ठिकठिकाणच्या महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. अत्यावश्यक सेवेत येणारी कार्यालयं सुरू आहेत तिथे कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांची वर्दळ काही प्रमाणात सुरू आहे ही बाब लक्षात घेऊन रेल्वेस्थानक, बसस्थानक, रुग्णालय, बँक, एटीएम, पोलीस ठाणे, महानगरपालिका कार्यालय आदी ठिकाणी फवारणी केली जात आहे. अकोला इथंही फवारणी आजपासून सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच डासांचा नायनाट करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीनं आठही प्रभागात निर्जंतुकीरकरण करण्यात येत असून औषधं फवारणी करण्यात येत आहे.