नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्रेसिंग-टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर कोरोनाशी लढा देण्यावर प्रशासनानं भर द्यावा आणि जनतेनेही या कामात सहकार्य करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते. कोरोनाबाधितांवर योग्य पद्धतीने उपचार सुरू असल्यामुळे, रुग्णांचा उपचारांना योग्य प्रतिसाद मिळून रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपचारादरम्यान कोरोनाग्रस्ताच्या सलग दोन चाचण्या नकारात्मक आल्यावर तो बरा होतो, आणि त्यानंतर रुग्णाला सुटी मिळते, त्यामुळे कोरोना बरा होतोच, हे सर्वांनी लक्षात घ्यावं, असं टोपे यांनी सांगितलं.

सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णसेवा सुरू ठेवावी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा असावा यासाठी रक्तदात्यांनी रक्तदान करावं, असं आवाहन टोपे यांनी केलं. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्यामुळे आता बाहेरच्या बाधित देशातून संसर्ग होण्याचा धोका नाही, मात्र देशातल्या रुग्णांपासून संसर्गाचा धोका संभवतो, त्यामुळे सर्वांनी समाजाच्या थेट संपर्कात येणं टाळावं, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं.

पीपीई किंवा एन ९५ प्रकारचे मास्क रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने वापरणं आवश्यक आहे, इतरांनी साधे मास्क वापरणं देखील पुरेसं असल्याचं, टोपे यांनी स्पष्ट केलं.