नवी दिल्ली : कोरोना विषाणूबाबत देशातली सध्याची परिस्थिती आणि 21 दिवसांच्या लॉक डाऊनमुळे लोक घरा बाहेर जात नसल्यामुळे शनिवार 28 मार्च 2020 पासून रामायण या रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिकेचे दूरदर्शनवर पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आणि प्रसार भारतीने घेतला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली.रामायण या मालिकेचे पुन्हा प्रसारण करणार असल्याची घोषणा करताना आपल्याला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. दर दिवशी दोन भाग म्हणजे सकाळी 9 ते 10 या वेळेत एक आणि त्यानंतरचा भाग रात्री 9 ते 10 या वेळेत दाखवला जाईल.
ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली होती हे लक्षात घेऊन आणि ती पुन्हा दाखवण्याची जनतेची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या दूरदर्शनच्या चमूचे, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांनी अभिनंदन केले आहे. दूरदर्शन साठी सामग्री उपलब्ध करून दिल्याबद्दल वेंपती यांनी सागर कुटुंबियांचे आभार मानले आहेत.
कोविड-19 बाबत जागृती निर्माण करण्यासाठी प्रसार भारती विशेष प्रयत्न करत आहे. वृत्त सेवा विभाग हिंदी आणि इंग्रजीत सकाळी 8 ते 9 आणि रात्री 8 ते 9 या वेळेत विशेष बातमीपत्र प्रसारित करत आहे.डी डी न्युज आणि डी डी इंडिया वरही अनेक विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत.