नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी ३५ जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे. सध्या १६० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. सध्या राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या २०३ झाली आहे. आज नवीन २२ रुग्णांची नोंद करण्यात आली.
मुंबईतल्या के. ई. एम रुग्णालयात कोरोनाबाधित ४० वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला, तर बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोना मुळे झाला तो मधुमेही होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं २४ करोना बाधित रुग्ण आढळून आल्याची गांभीर्यानं दखल घेऊन मिरज इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचं रूपांतर कोरोना बाधितांसाठीच्या रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोवीड-१९ चा सामना करण्यासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त ५०० खाटांचे सुसज्ज विलगीकरण कक्ष उभारण्यात येईल, असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं आहे.
भंडारा जिल्हयात शीघ्र प्रतिसाद पथकानं भेट दिलेल्यांची संख्या ४३ झाली आहे. त्यापैकी चार व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे आणि सात रुग्णांचे नमुने नागपूरच्या मेयो रुग्णालयात तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत. सध्या १४ व्यक्ती रुग्णालयात विलगीकरण कक्षात आहेत. तर घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या २९ आहे.