पिंपरी : देशात लॉकडाऊन असला तरी रुग्णांची संख्या वाढत गेल्यास लॉकडाऊनची स्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही स्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांना विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. वीज बिला व्यतिरिक्त विलंब शुल्क करार नये तसेच कोणाचाही वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी उर्जामंत्री राऊत यांच्याकडे केली आहे.
याबाबत बाबर यांनी उर्जामंत्री राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या 193 वर जाऊन पोचली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास शासनाने मनाई केली आहे. फक्त अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठीच नागरिकांनी बाहेर पडावे, असे शासनाने सुचित केले आहे. सध्या महाराष्ट्रातील सर्व कारखाने लॉकडाऊन आहेत.
महाराष्ट्रातील सर्वच नागरिक ऑनलाइन पद्धतीने विज भरणा करीत नाहीत. महाराष्ट्रातला बहुतांश भाग हा ग्रामीण आहे तसेच शहरी भागात सुद्धा अजून पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने वीज भरणा केला जात नाही. लॉकडाऊनची स्थिती अजूनही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णांची संख्या वाढत गेली तर लॉकडाऊन अजून काही महिन्यापर्यंत वाढू शकतो .
त्यामुळे लॉकडाऊनची स्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांना विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी व विज भरणा व्यतिरिक्त विलंब शुल्क लावू नये तसेच कोणाचाही वीज पुरवठा खंडित करू नये अशी बाबर यांनी मागणी केली आहे.