नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य राखीव पोलिस दलाच्या  शंभर जवानांची एक तुकडी ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा शहरात तैनात करण्यात आली आहे. मुंब्रा पोलिस ठाण्याचे १६० अधिकारी आणि कर्मचारी सध्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असून त्यांना सहाय्य करण्यासाठी २३ होमगार्ड देखील पाठवण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्येही  नागरिकांचं  रस्त्यावर उतरण्याचं प्रमाण कमी होत नसल्यानं  राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी  तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मुंबईच्या ज्या भागात ‘करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्या परिसरांचं  ‘जीआयएस मॅपिंग’ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं  घेतला असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या मॅपिंगमुळे त्या परिसराचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल. यामुळे  त्या भागातील नागरिकांवर लक्ष ठेवणं  आणि कोरोनाला प्रतिबंध करणं  सोपे होणार आहे. मुंबईच्या विविध भागात कोरोनाचे संशयित आढळत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतला वरळी कोळीवाडा आज पासून मुंबई महापालिकेने सील केला आहे. या भागात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. या भागात आता कोणालाही प्रवेश दिला जात नाही तसेच या भागातील राहिवाशानाही बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येथील सर्वच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी सुरू केली केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत अफवा पसरवून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला आज पोलिसांनी अटक केली. पठाणवाडी इथं राहणाऱ्या या व्यक्तीनं वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवली, अशी माहिती पोलीस उपयुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी दिली.
बुलढाण्यातल्या एका व्यक्तीचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर हा रुग्ण राहत असलेल्या परिसराच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातल्या २० हजार घरांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात दोन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर ते राहिले त्या मुकुंदनगर भागातले रस्ते प्रशासनाने सील केले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी या भागात घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत.
अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयातल्या आयसोलेशन कक्षात रात्री कोरोनाचे आणखी तीन संशयित रुग्ण दाखल झाले. त्यातले दोघे मुर्तीजापुरचे तर एक जण अकोटचा आहे. त्यांचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.