मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई : लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांसाठी विशेष पॅकेज देण्याचे केंद्र शासनाच्या विचाराधीन असून या संदर्भात राज्याकडून माहिती मागविली आहे. केंद्राने याबाबत राज्याच्या मत्स्यविभागाला पत्र लिहून झालेल्या नुकसानीची माहिती मागवली आहे.
मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले, लॉकडाऊनमुळे अन्य व्यवसायांबरोबरच मत्स्यव्यवसायालाही फार मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. केंद्राने मच्छिमारांना विशेष पॅकेज घोषित करावे ह्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर केंद्र शासनाने राज्याकडून मच्छिमारांच्या नुकसानीची माहिती मागविली आहे. त्यानुसार राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाला त्याची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्राचे पत्र प्राप्त झाल्यानंतर राज्याच्या मत्स्यविभागानेही सर्व जिल्ह्यांच्या सहायक मत्स्य आयुक्तांना पत्र पाठवून मच्छिमार संस्थांकडून केंद्र शासनाने सांगितलेल्या नमुन्यात माहिती मागवायला सुरुवात केली आहे.