पिंपरी : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. काही लाख लोकांना याची लागण झाली आहे, तर काही हजार निरपराधाना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. त्याला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहरातही सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन यांनी शहरातील बेवारस निराधार शिवाय वेगवेगळ्या राज्यातुन आलेले मजूर व इतरांची मनपाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत शाळामध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.

निरनिराळ्या सामाजिक संस्थानी येथील लोकांची खाण्या पिण्याची जबाबदारी घेतली आहे. जागृत नागरिक महासंघानेही यामध्ये खारीचा वाटा उचलत, 1 एप्रिल 2020 रोजी मनपाच्या आकुर्डी शाळेत पोलीस कर्मचारी, होमगार्ड, मनपा कर्मचारी यांच्यासह सर्व मुक्कामी नागरिकांना 150 नाष्टा पाकिटांचे वाटप केले. ज्यामध्ये चिवडा, फरसाण, उपवास चिवडा, भाकरवडी, शेव, लसूण शेव मका चिवडा, इ. कोरडा नाष्टा समाविष्ट होता. प्रत्येकी 500 ग्रॅम चा हा नाष्टा या लोकांना रोज थोडा थोडा खाता यावा, हा यामागील हेतू आणि उद्देश आहे.

ज्या समाज्यात आपण राहतो, मोठे होतो त्या समाज्याचे आपणही काही देणे लागतो. याच एका सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून जागृत नागरिक महासंघाने हा खारीचा वाटा उचलला आहे. या उपक्रमात संस्था अध्यक्ष नितीन यादव सचिव उमेश सणस सदस्य प्रकाश गडवे यांनी सहभाग घेतला. यासाठी मनपा प्रशासनतर्फे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार उपअभियंता चवरे आरोग्य विभागाचे मानकर व पोलीस यांनी सहकार्य केले.

नुकतेच सांगली, सातारा, कोल्हापूर भागात झालेल्या महापुरात संस्थेने सांगली भागात प्रत्यक्ष पुरग्रसथांच्या घरोघरी जाऊन 450 किटचे वाट केले होते. यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, दाळ, साखर, चहा, ब्रश, पेस्ट, साबण, डिटर्जंट पावडर, सॅनिटरी न्याकपीन, औषधे, कपडे, ब्लॅंकेट, चादर, भांडी, वगैरे वस्तूंचा समावेश होता.