नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय प्राधान्य कुटुंब योजना आणि एपीएल योजनांच्या लाभार्थ्यांना एकत्रित तीन महिन्याचे धान्य उपलब्ध करण्यात येणार होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला असून एप्रिल, मे व जून महिन्याचे धान्य त्या-त्या महिन्यात वितरीत केले जाणार आहे.

त्यानुसार एप्रिल महिन्याचे धान्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे वाशिमचे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कळविले आहे.अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य देण्यात येणार आहे.

यामध्ये १५ किलो गहू व २० किलो तांदूळ मिळणार आहेत. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मिळणार आहेत. तसेच एपीएल लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती ४ किलो गहू आणि १ किलो तांदूळ वितरीत केले जाणार आहेत. सर्व लाभार्थ्यांना प्रतिकिलो २ रुपये दराने गहू आणि प्रतिकिलो ३ रुपये दराने तांदूळ मिळणार आहेत. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना २० रुपये प्रतिकिलो दराने १ किलो साखर मिळणार आहे.