नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामनवमीनिमीत्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शासकीय नियम आणि संचारबंदीचे आदेश पाळत लातूर इथल्या पुरातन राममंदिरात आज श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला.

देवळाचे पुजारी आणि दोन महिलांच्या उपस्थितीत रामाचा पाळणा आणि आरती झाल्यावर मंदिर बंद करण्यात आलं. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर तसंच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर अशी खबरदारी पाळण्यात आली. नाशिक इथल्या काळाराम मंदिरात आज दुपारी मंदिराच्या चार पुजाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला.

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या समर्थ रामदासांच्या जन्मगावी होणारा रामनवमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीनं यंदा रद्द केला. त्यामुळे रामनवमी उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

याठिकाणी पोलीस बंदोबस्त असून पूजेसाठी केवळ पुजाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. परभणी जिल्ह्यात नागरिकांनी आपापल्या घरात पारंपारिक पद्धतीने रामनवमीचा उत्सव साजरा केला. काही मंदिरांमध्ये पुजार्यांरनी दोन-तीन भक्तगणांच्या उपस्थितीत रामनवमी साजरी केली.