नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक मेळाव्यात कोकणातले २०० जण सहभागी झाले होते, अशी माहिती प्रशासनाला मिळाल्याचं कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले तिघे जण असून ठाणे जिल्ह्यातले १३९, रायगडमधले ४२, तर पालघर जिल्ह्यातल्या १६ जणांचा समावेश होता.
यवतमाळ जिल्ह्यातून निजामुद्दीन इथल्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ३४ लोकांची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. या पैकी २८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केलं आहे. सहा लोक अद्यापही जिल्ह्यात परत आलेले नाहीत. मात्र हे सहाजण ज्या गावांना गेलेले आहेत, तिथल्या जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधला असून या लोकांची माहिती घेतली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात एका ग्राम सेवकानं दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सात जणांची तपासणी करण्याचा आग्रह केल्यामुळे सात जणांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या सातही जणांची चाचणी केली असून त्यांचा अहवाल नकारात्मक आलाय, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.