पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे भागातील म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिकाची क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने डॉ. म्हैसेकर यांनी पाहणी केली. यावेळी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, खेडचे प्रांतधिकारी संजय तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, सिम्बायसीस हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय नटराजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन जाधव आदि उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी सिम्बायसीस येथील प्रमुख डॉक्टरांशी चर्चा करुन हॉस्पिटल मधील आयसोलेशन व क्वारंटाइन सुविधाबाबत पाहणी करुन उपलब्ध सुविधेबाबत येथील चर्चा केली.

पुणे जिल्ह्यात कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आयसीयु व आयसोलेशन बेडची तयारी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने सिम्बायसीस येथे आयसोलेशन बेडची सोय करण्यात येणार आहे. तसेच काही खाजगी कंपन्यानीही क्वारंटाइन सुविधेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्‍टीने काही खाजगी कंपन्यांच्या सुविधेचे पाहणी करुन माहिती घेण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.