नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रीडवर भार येऊन वितरणात बिघाड होण्याची भीती अनाठायी असल्याचं ट्विट केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं केलं आहे.

भारताची पॉवरग्रीड ही मजबूत आणि स्थिर असून मागणीतले चढउतार पेलण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे ही भीती निराधार असल्याचं केंद्रीय ऊर्जा खात्यानं म्हटलं आहे.

प्रधानमंत्र्यांनी उद्या रात्री ९ मिनिटं फक्त आपापल्या घरातले विजेचे दिवे बंद करायला सांगितलं आहे. रस्त्यावरचे दिवे किंवा घरातली रेफ्रिजरेटर्स, एसी, संगणक, दूरध्वनी, पंखे यासारखी विजेवर चालणारी इतर उपकरणे बंद करण्याचं आवाहन केलेलं नाही. फक्त घरातले विजेचे दिवे बंद करायचे आहेत.

रुग्णालये, सार्वजनिक सेवा पुरवणारी इतर ठिकाणं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा, कार्यालयं, पोलिस ठाणी, उत्पादन केंद्रं, इत्यादी ठिकाणी दिवे सुरूच ठेवायचे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विजेचे दिवे सुरूच ठेवावेत अशी सूचना देण्यात येत आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.