मुंबई (वृत्तसंस्था) : शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचं स्वागत करताना शाळेच्या परिसरातल्या 6 ते 14 वयोगटातल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून, शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेश द्यावा. यासाठी जवळच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्यांमध्ये सर्वेक्षण करावं, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षी राज्यात कधीच शाळेत न गेलेल्या ६ ते १४ वयोगटातल्या बालकांची संख्या ७ हजार ८०६ होती, तर अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या १७ हजार ३९७ होती. यापैकी विशेष गरजाधिष्ठित बालकांची संख्या १ हजार २१२, बालकामगारांची संख्या २८८ तर अन्य कारणांमुळे शाळाबाह्य होणाऱ्या बालकांची संख्या २३ हजार ७०४ इतकी आहे.